रानात माझ्या
झुळझुळ वाहे पाट
करी पिकास जलदान
रिते करीत .. अपुले पोट !!१!!
रानात माझ्या ..
चाले उभा नांगर..
उकरीता जमीन...
देतसे तिला उभार..!!२!!
रानात माझ्या...
पान्हा फुटुनी.. हंबरते गाय..
गुरा वासरांना प्रेम देत ..
चारापाणी घालिते माय !! ३!!
रानात माझ्या ...
उभी बगळ्यांची माळ..
कान्हा घाली शिळ ..
अन् घुमे सारी रानोमाळ !!४!!
रानात माझ्या ..आई बा
कष्टत माती पूजा.. पुन्हा पुन्हा..
देई भरभरूनी ..धन धान्य
देवी अन्नपूर्णा ..देवी अन्नपूर्णा !!५!!
कवी - श्री बाळासाहेब देशमुख
सावेडी, अहिल्यानगर.
गगनचुंबी इमारतींच्या छायेत,
हिरव्या-निळ्या स्वप्नांची सरितेत,
पावलोपावली उमलतं काही,
हीच मुंबई – स्वप्नांची नगरी आहे काही!
धावपळीच्या लाटांवर चालते,
दिवस-रात्र एकसंध टाळते,
कष्टकऱ्यांची, कलाकारांची माय,
इथे स्वप्नांचंही लागतं डोळ्यांत वाय!
लोकलच्या गाडीत भावनांचं थैमान,
प्रत्येक चेहऱ्यावर वेगळं एक गाणं,
कधी संघर्ष, कधी आनंदाचा वास,
मुंबईचं जीवन – एक रंगीत प्रवास!
चिंब पावसात भिजलेलं मरीन ड्राईव्ह,
चाट-पावभाजीचा भन्नाट लाईव्ह,
बोलक्या गल्ली, झगमगत्या रस्ते,
इथे स्वप्नंही करतात हवेत नटते!
भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान,
तीनही काळांचं एक सुंदर संगमस्थान,
इथे येतो तो हरवलेला शोध घेऊन,
आपलं अस्तित्व इथे कोणी ना विसरून!
मुंबई – तू आहेस एक झंझावात,
आशा, प्रेम, संघर्षाचं तू रेखाट,
जगभरात कुठेही जरी जावं,
स्वप्नांच्या नगरीला विसरू शकतो का मानव?
कवी - अमर बनकर पाटिल
सावळज, जिल्हा - सांगली
आली आली वारी
ध्वजा घेऊ खांद्यावरी
चला जाऊ पंढरपूरी
चंद्रभागे तिरावरी
सा-या मराठी मनाची
माझ्या महाराष्ट्र राज्याची
कुलस्वमीनी आमुची
देवी माता तुळजापुरची
टेकू माथा चरणाशी
चला जाऊ सोलापूरला
चढवू चादर परमात्म्याला
तिथून जाऊ पंढरीला
भेटू विठूमाऊलीला
दत्तधामी गणगापूरला
अंबाबाई कोल्हापूरला
नंतर जाऊ नागपूरला
गोड संत्री आणायला
पाहू या चंद्रपूर नगरी
कोळसा खाणी कितीतरी
कोकणा सांगतात भारी
फिरु सागर किनारी
काजू चिकू नी सुपारी
हापूस आंब्याची न्याहारी
अलिबाग रत्नागीरी
कलिंगडाच्या आगारी
चला जाऊ या सिंधुदुर्गला
स्वराज्याच्या मानबिंदुला
वारीचा प्रवास संपला.
मुजरा करु या महाराष्ट्राला
चला नासिकला जाऊ
अंगुराचे बागीचे पाहू
थोडं लासलगावला जाऊ.
कांदा चाळ पाहून घेऊ
आलो आलो सागरतीरी
उभा सिंधुदुर्ग महाकेसरी
करु या मुजरा या स्वारी
इथे संपवू आपुली वारी
कवी - प्रदिपगुरुजी पिंपळनेरकर (रमाई सुत )
गाव/शहर - छ. संभाजीनगर
जिल्हा - छ. संभाजीनगर
आपल्या महाराष्ट्राची राजधानी
"मुंबई "जणू स्वप्नांची नगरी!
इथेच होती, आशांची पूर्ती
समुद्राची गाज हासरी ॥
"इंडिया गेट " आमच्या
भारताचे प्रवेशद्वार!
नांदती अनेक धर्म इथे
नसानसात हो!आचार विचार ॥
खेडवळ जरी आला इथे
शिकून होतो मोठ्ठा
नौकरीची नाही ददाद
खातो आनंदाने पेठा ॥
स्वप्न त्याच्या घराचे
पूर्ण होते कष्टाने
हिंमत त्याची वाढते
छाती फुगते अभिमानाने!॥
विधान भवनातले ते
सच्चे मंत्री तत्पर!
घोष आमच्या शिवाजींचा
बोला महादेव हर हर॥
लहाण मोठ्यांना खुणविती
सुंदर राणीचा बाग
संगीताची आवड जोपासणारे
गातात "केदार " राग ॥
चला एकदा मुंबईला
स्वप्नातली दुनिया पहायला
आपल्या स्वप्नपूर्तीचे वारे
लागतील बघा वहायला ॥
कवी - सौ. जयश्री प्र. जोशी
नांदेड सीटी, पुणे.
माझ्या महाराष्ट्रातील कोकण
निसर्गाची करि मुक्त हसत उधळण ....
अप्रतिम सौंदर्याच्या झलका
पाहता मनाचा होई ताण हलका.
हिरवी पिवळी दाट झाडी
नागमोडी वळणाचे वाट....
डोंगर दर्यातून वाहे नदी
उत्तुंग असा सह्याद्री घाट....
उंच उंच डोंगर माथा
पायथ्याशी समुद्री लाटा...
थंडगार वाऱ्यासंगे वाहे
अथांग सागर साठा....
घर कौलारू दिसते छान
अंगणी तुळशी सुंदर पान
मंदिराची न्यारीच शान...
प्रसन्न टुमदार दिसे महान
उंच डोंगर पहाडी
निळे निळे सागराचे पाणी...
छान छान समुद्री होड्या
कोकण फळांचे मेजवानी....
फणस पोफळीच्या बागा
वाऱ्यासंगे झोकात डोले
माडांना बांधलेला झोपाळा
कवी त्यांच्या मस्तीत झुले...
रहस्य कोकणाचे
मनमोहीत करणारे....
भुरळ मनाला घालणारे
आकर्षणीय सौंदर्याचा
सदार्थ साऱ्या जगाला सांगणारे..
साऱ्या जगाला सांगणारे........
कवी - वनिता नवनाथ साळुंके घायगाव ता.वैजापूर जि. छ.संभाजीनगर
महाराष्ट्र हा पश्चिम
किल्ले ते ऐतिहासिक
काय वर्णावीत लेणी
येथे सगळे भाविक||१||
विठ्ठलाचे ते मंदिर
पंढरपूरला स्थित
अष्टविनायक खास
ज्योतिर्लिंग उपजत||२||
ज्ञानेश्वर, नामदेव
एकनाथ, तुकाराम
चोखामेळा, झाले संत
यांचे अभंगा नमन ||३||
शिवबाचे जन्मस्थान
किती वर्णू शिवकथा
शूरवीर ते मावळे
भारी त्याच शौर्य गाथा||४||
कला, साहित्य, समृद्ध
लोककला नि संगीत
चित्रकला अन् नाट्ये
काय सांगू भावगीत||५||
नैसर्गिक हे सौंदर्य
विविधता ती जैविक
असा हा पश्चिम घाट
वारसाच सांस्कृतिक||६||
महत्वाचा आहे भाग
भारताच्या इतिहासी
महाराष्ट्र हा पश्चिम
झालो येथे रहिवासी||७||
कवी - सौ. उषा सत्येंद्र वराडे
पुणे
प्रकाश मागतो अंधारातून
विदर्भ आमचा ओरडतो
शेतीत माळ धरली काळी
शेतकरी डोळे भरतो
विजेचं वचन फसवं झालं
सिंचनाचं स्वप्न विरलं
नेहमीच आश्वासन नवी
पण पाणी कुठेच नाही झिरलं
विदर्भाचा जीव कासावीस
आत्महत्या बनल्या बातम्या
शब्दाचे पुल पडले तोकडे
नाहीत कृतीच्या वाटा पक्क्या
वेगळ्या राज्याची मागणी
म्हणजे हक्काची खुर्ची
जिथं विकास नवे केवळ भाषण
तर कशी होईल मागण्यांची पुर्ती
राजधानी दोन पण सत्ता मात्र एक
आवाज हा दडपशाहीत हरवतो
विदर्भ वाट बघतो नव्या विकासाची
समजून घ्यावं इतकच आम्ही मागणं मागतो
कवी - डॉ.स्मिता गजभिये/ तिरपुडे
लाखनी
नाव तिचं मुंबई
रस्ते तिचे काय बई
पाण्याखालून जाई
मेटाकुटी जीव होई
कोस्टलरोड,मरीन लाइन
नवी मुंबई,काय दहिसर
लाटाच लाटा किनारपट्टी वर
बोगद्यावर बोगदे जूहुबीच काय तर
बांद्रावरळी सीफेस
गेट वे ओफ इंडिया रेस
रेसकोर्स नाका टमटमची गर्दी
ताजमहाल परिपूर्ण जूहुसाठी सर्दी
नरीमन विरार चाळीस मिनिटात
चाळी मधला मध्यम वर्गीय
रोज खोकतो खारी हवा
वर्सोवा रस्ता महानगरीय
म्हातारीचा बूट,डबल डेकर
चौकाचौकात इमारती थिएटर
चोर पाकिटमारांची बजबज
श्वास प्रामाणिकाचा जगू देत नाही तर
इथे स्वप्ने होती साकार
पैशांची झाडे झाडांचा बाजार
देशावरती मध्यवर्ती
नाव तिचं मुंबई
स्वप्न नगरीची ठाणवई
कवी - श्रीकृष्ण कुलकर्णी
सर्जा राजा सोबतीला, बळी जाई शिवारात
देव देव्हारी शोभती ,आजी आजोबा घरात//धृ//
खानदेशातील माती, उपजाऊ काळीभोर
दुधी कारल्याचे वेल, वाढताती विना घोर
ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर, तीर्थक्षेत्री वेरुळात //१//
साध्या भोळ्या माणसात , माया ममता अपार
बोली भाषा अहिराणी, आपुलकी मनी फार
आतिथ्यशीलता दिसे, स्वागत घराघरात //२//
रानीवनी विहरती, पशुपक्षांचे ते थवे
सहा ऋतूंचे सोहळे, गंध दरवळ नवे
गोड अहिराणी बोली,सर्वांच्याच ती मुखात //३
गाईम्हशी गोठ्यामध्ये, दुध दुभते अपार
शाळा देती विद्या ज्ञान , प्रेम शिक्षकांचे फार
मायमातीचा सन्मान, कला संस्कृती थाटात //४//
सडा प्राजक्त अंगणी,काकणांची किणकिण
गाव जपतो जिव्हाळा, गप्पाटप्पा शब्दवीण
आठवड्याच्या बाजारी, जणू जत्राच गावात //५//
कवी - सौ. सरोज सुरेश गाजरे
भाईंदर, ठाणे
मायावी नगरी ही मुंबई सुंदर
स्वप्नपूर्तीचे भासते महाद्वार!
जगण्या मरण्या स्पर्धा फार
जो जिंकला तोच सिंकदर!
संघर्ष हा पावला पावलावर
रोजच घडतो पहा चमत्कार!
मुंबई स्वप्नांची नगरी खरोखर
पदरी पडते जीत किंवा हार!
समजते भाग्य रेखा बरोबर
जर उभा यशाच्या पायरीवर!
रोटी कपडा मिळतोच भरपूर
जरी नसले डोक्यावर छप्पर!
जीवाची हौस म्हणा मुंबईकर
काम अन दाम संधी भरपूर!
चित्रपट नगरी ओळख जरूर
नशीब आजमावणे तकदिर!
विचारू नका मुंबईत संस्कार
जशी ऍलर्जी समजावी जरूर
रमला जो मुंबईत जीवनभर
नाही परतला कधी गावावर!
मुंबई धावते पहा घड्याळावर
सेकंद अन मिनिटे हमसफर!
किती पैसा रे बॅंक खात्यावर
जीवाची मुंबई तळहातावर!
नाही कुणाशी स्पर्धा वारंवार
ज्याचे त्याला पडले निरंतर!
कुणी घरात कुणी फुटपाथवर
चित्र दिसते असे सभोवार!
मुंबई स्वप्नांची नगरी हो सुंदर
ज्याला भावली तो मुंबईकर!
कवी - श्री अशोक महादेव मोहिते
सैनिक,कविवर्य,लेखक
बार्शी, जिल्हा सोलापूर
मुंबई स्वप्नांची नगरी आहे
स्वप्न पूर्ण होण्याची जागा सत्य
महिला भगिनी कामकरी
कोणीही नाही बोलत असत्य
मुंबईत लोकलने फिरू या
सहल करूया लोकलने
डबलडेकर बसने मजा करू या,
कधीकधी सफर करु सायकलने
मुंबईचे माल धक्का मोठे बंदर
आहेत विमानतळ मुंबईचे सुंदर
ताजमहाल हॉटेलचा नजारा
सौख्याचे आगर माझे माहेर
मुंबईत आयटी कंपन्या आहेत
आणि मोठ्या संस्था
अठरा पगड जाती नांदतात
एकत्र बाळगतात सर्व आस्था
मोठे प्रवेशद्वार आहे
उप शहरे ठाणे विलेपार्ले मुलुंड
कल्याण डोंबिवलीचा विस्तार
सकाळी कामाची गडबड
मुंबईत बोरिवली मलाड आहे
मुंबईत मोठा विमानतळ
गोरेगाव बांद्र्या नवी वाशी
उपनगरे जणू पवित्र गंगाजळ
बंगले बागा इमारती उंच
गिरगाव ची चौपाटी भारी
तसेचआल्टामाउंट रस्याचे वैभव
मुंबई स्वप्नांची भव्य नगरी
परदेशी येतात पाहुणे
रम्य परिसर पाहण्यासाठी
जुहू बिच वरती जोडपी येतात
नवविवाहित मधुचंद्रा साठी
दादर मुंबईचे हृदय आहे
अनेक होतात कार्यक्रम सभा
तिथे कबुतर खान्याचाआनंद
संगीत समारंभ तेजस्वी आभा
हाजी अली दर्गाचा ऐतिहासिक
तिथे समुद्रावरती दर्गाचा विस्तार
आणि चित्रपट गृहे मोठी छोटी
समुद्राची खाडी मिठागर
सिद्धिविनायक ची शांती , भक्ती
भक्तीमय आहे सुंदर मंदिर
भगवान गणेशाची कृपा आहे,
मुंबापुरी जगप्रसिद्ध अजरामर
खरेदी करण्यासाठी मोठी
साड्या कपडे क्रोकरीची दुकानं
आणि मनोरंजनासाठी नाट्यगृहे
भव्य वानखेडे क्रिकेट चे मैदानं
सर्व प्रकारच्या जाहिराती
मोठी उपहारगृहे खाऊंची
चायनीज, मद्रासी, पंजाबी
पाणीपुरी मिसळ खाऊ भाऊंची
कवी - सौ श्रद्धा सुहास शिंदगीकर वारजे, पुणे
महाराष्ट्राच्या मातीमध्ये
जन्मले फुले शाहू आंबेडकर
त्याच मातीमध्ये स्वराज्य रचिले
ते शिव छत्रपती शुर विर....
या मातीच्या पुण्याईने
इथे झाले विद्वान धुरंधर
फुले सावित्रीने ज्योत लावली
शिक्षणाची दारोदार....
तुकडोजीची समाजवानी
सांगते जीवनाचे सार
तुकारामाची गाथा ऐकता
देते जगण्यास आकार....
महाराष्ट्राची महाभूमी
देती देशालाही धार
बाबासाहेबांच्या संविधानाने
दिला कायद्याचा आधार....
या मातीच्या तटावरती
लढले मावळे सरदार
स्वराज्याचे तोरण बांधले
शिवबांनी तोरणा किल्ल्यावर....
माय भूमीला नमन करतो
फुगतो माझा ऊर
जन्म होऊ दे पुन्हा माझा
याच धरतीवर....
कवी - भास्कर अर्जूनराव गिते
कंधारकर
लाज सोडून कष्टाची
ज्यांची असते तयारी
भविष्य त्यांचेच घडवते
मुंबई आमची स्वप्ननगरी ।।
शुन्यातून विश्व निर्माण
इथे प्रत्येकाचे करी
महाराष्ट्राचं भुषण आमची
राजधानी ही स्वप्ननगरी ।।
देशाच्या अर्थव्यवस्थेचा
कणा आहे सांभाळणारी
मराठी अस्मितेचा बाणा
जपून ठेवते ही स्वप्ननगरी ।।
रूढी परंपरा आणि संस्कृतीचा
सर्वधर्मसमभाव हा जपणारी
समता बंधुता आणि एकतेचा
वारसा ही जपते स्वप्ननगरी ।।
वैभवशाली इतिहासाची साक्ष
महाराष्ट्राची शान मुंबई नगरी
मुंबादेवी, सिद्धिविनायकाने
पावन केली अशी ही स्वप्ननगरी ।।
कवी - संभाजी रामकृष्ण गोरे
मुंबई असे जन माणसांची
मायानगरी,
स्वप्नांची दुनियादारी... l1l
मायानगरीची लोकल न
थांबे,धावे दिवस -रात्र..
कातरवेळी जणू भासते
चाकरमान्यांसाठी नाजूक
मात्र... l2l
डबेवाल्यांची असे इथे
वेगळीच शान..
दखल घेतली माया नगरीची
आशिया खंडातील तो मान
l3l
मुंबई लाखोंच्या स्वप्नांची
चित्रपट सृष्टी...
लोभस वाटते गगन भरारी
गगनचुंबी इमारतींची दृष्टी
l4l.
आली बहुत संकटे चालून
मुंबापरी...
तरी न डगमगली थाटात उभी
स्वप्नांची मायानगरी l5l.
रंग पाहिला या मोह
मायानगरीचा...
चुके काळजाचा ठोका बंद
विचारमैफिलींचा l6l.
हा सागरी किनारा,
चौपाटींचा ओला सुगंध
वारा...
गिरगाव, दादर,सी - लिंक,
वरळी, शोभे महाराणी च्या
गळ्यातील हारा l7l.
मोह न सुटे इथे
वावरण्याचा...
लाभो सहवास वर्षानुवर्षे
जुन्या चाळीतील
मोह-मायांचा l8l.
वडापाव,गरमागरम भजी
मान्सूनात असे आहार,
धावत्या स्वप्नांच्या मुंबईचा...
विसर न पडावा जिभेवर
रेंगाळलेल्या त्या चवींचा l9l
राजधानी शोभिवंत..
मायानगरी ( मुंबई स्वप्नांची)
शिव- शंभू चरणी दंडवत
अवघ्या महाराष्ट्राची ll10ll.
कवी - महाडिक पल्लवी भास्करराव
संशोधक विद्यार्थिनी, ता. जि. अहिल्यानगर.
शिवरायांचे स्वराज्य
शोभे गड अन् किल्ले
संस्कृतीचे जतन करीतो
सह्याद्रीत रोखीले शत्रूचे हल्ले
सुजलाम सुफलाम
असे पश्चिम राज्य पवित्र
सुखशांती सदा राहो
भरभराट नांदत असे सर्वत्र
गाथा श्रेष्ठ महाराष्ट्रची
जन्मले फुले , शाहू, आंबेडकर
लढले शिव छत्रपती
होऊनी घोड्यावर स्वार
स्त्री शिक्षणाची गंगा
आणली सावित्री जोतीने
स्वतंत्र जगण्याचा अधिकार
दिला बाबासाहेबांच्या संविधानाने
भजन, भारूड, पोवाडा
लोककला महाराष्ट्राची लावणी
नटली आहे वसुंधरा
दिसे नववधू सम देखणी
सर्व धर्म समभाव इथे
शिकवून गेले महान संत
पंढरपूरच्या वारीने शिकविले
समता एकात्मता,नाही मनात खंत
बोलीभाषा असे आमची मराठी
बोला , लिहा, जपा माय मराठी
अभिजात भाषा अमुची
महाराष्ट्राची संस्कृती मराठी
गर्जा महाराष्ट्र माझा
सर्व देशात महान
दिल्लीचे तक्थ राखीतो
ऊंचावितो अमुची मान
कवी - प्रिया माकोडे
यवतमाळ
माझ्या कोकणच्या मातीत, तरू भाताचे डोलतात
तरू भाताचे डोलतात, हात अखंड राबतात
माझ्या कोकणच्या मातीत, माड आकाशी भिडतात
माड आकाशी भिडतात, मध्ये पोफळी डोकावतात
माझ्या कोकणच्या मातीत, आंबा फणस पिकतो
आंबा फणस पिकतो, देशी-विदेशी पोहोचतो
माझ्या कोकणच्या मातीत, काजू कोकम बहरतो
काजू कोकम बहरतो, तृष्णा रसना भागवितो
माझ्या कोकणच्या मातीत, निसर्ग फुलतो
निसर्ग फुलतो, अवघ्या जगा ओढ लावितो
माझ्या कोकणच्या मातीत, सागर विसावतो
सागर विसावतो, कोळी मासळी शोधतो
माझ्या कोकणच्या मातीत, पाऊस कोसळतो
पाऊस कोसळतो, सारा कोकण सुखावतो
कवी - सौ. जयश्री अनिल पाटील
सांगली.
लाल माती पायाखाली
डोईवर पर्जन्य सरी
आंबे, फणस, काजू च्या
पायघड्या वाटेवरी...1
समुद्र नितळ सुंदर
गर्दी ताडा माडाची
सुक्या मासळीच्या माळा
शोभा वाढे किनार्याची...2
बोगनवेल आणि जास्वंद
कुंपणावर हळू डोकावते
सुरंगी अबोली जास्वंद
सुंदरा केसात माळते ...3
गणपती आणि होलिका
आनंदाची धमाल लयलूट
लोकनृत्य आणि परंपरा
निसर्गाशी नाते अतूट...4
कोकणचा निसर्ग राजा
उधळे सौंदर्य पानोपानी
येवा गाव आपलाच असा
बोलावितो मला क्षणोक्षणी...5
कवी - अमोल निरगुडे
जि. : ठाणे
जय देश महाराष्ट्र माझा,
जागवीतो स्वाभिमान,
भुमी संतांच्या किर्तीची,
आहे आम्हा अभिमान......१
संस्कृतीची परंपरा,
तुरा रोवती मानाचा,
कार्यक्षम सुसंस्कृत,
अधिकारी सन्मानाचा.....२
क्रिडा कृषी संशोधन,
क्षेत्रातही नाद वेडा,
चमकणे जिते तिथे,
उचलला आहे विडा......३
छत्रपती शिवाजींच्या,
शौर्य कथा अभिजात,
अजुनही वास्तवात,
प्रत्येकाच्या हृदयात......४
गर्जा महाराष्ट्र माझा,
वारसा संस्कृतीचा,
आशिर्वाद आहे सदा,
आई भवानी मातेचा......५
कवी - नवनाथ रामकृष्ण मुळवी
गोवा
आपली पवित्र मातृभुमी
अनेक थोरवीर युगपुरूषांची
नावाजली ही कर्मभुमी ....१
नररत्नांची खाण उद्ययास येई
मातृभूमीप्रती ठेवी कृतज्ञताभाव
वीरजवान याच मातृभूमीत दोडले
तव विजयोत्सवात नसे कधी अभाव....२
कर्मभुमीत जन्मलो वाढलो खेळलो
माता-पित्यांचे फेडू कसे पांग ॠण
ऋणानुबंधांत जोडले गेलोंत
मनावर उमटे ना तरंग ना वण ...३
मातृभुमीत घडला इतिहास
मातीत वीरांनी उमटवला ठसा
कर्मभूमीत अनमोल रत्ने
क्रांतिवीरांनी हाती घेतला वसा...४
मातृभुमीत दरवळे हरिततृण
बळीराजास आनंदे सुखावले
आपुलकी एकोप्याने प्रेमाने
आत्मियतेने जगण्यास शिकवले....५
कवी - सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
नाशिक
ही घनदाट झाडी
पाहून झाले मी निसर्ग वेडी
इथे वाहते नदी दुथडी
मन हा निसर्ग न सोडी
निसर्ग हा कोकणाचा
भरपूर सुक्यामेव्याचा
सुंदर आठवणींचा
माडांच्या बनांचा
कोकणात जाण्यास
तयार असते कोणी पण
कारण असो काही पण
नाही म्हणण्याचे नसे शहाणपण
प्रत्येकाने घ्यावा
कोकणचा आस्वाद
निसर्ग स्वच्छ ठेवल्यास
कोकण निसर्गच देईल साद
कवी - सौ. अनघा शाम कुलकर्णी
मोशी प्राधिकरण, पुणे.
म्हणतात यास विद्यापीठ
असे आहे हे ज्ञानपीठ
विद्यार्थी घडवतात सार्थ
असे हे रामानंद ज्ञान तीर्थ
प्रवेश मिळता होतो आनंद
कारण असे रामानंद
प्रत्येक विभाग असे विस्तीर्ण
विद्यार्थ्यांना वाव असे संपूर्ण
प्राध्यापक करतात खूप सहाय्य
गाठण्या विद्यार्थ्यांस त्यांचे ध्येय
विद्यार्थी झटतात अहोरात्र
न राही कुणीही गलितगात्र
उद्दिष्ट असते याचे
नव संकल्पना संशोधनांचे
प्रोत्साहित करते विद्यार्थ्यास
वाढविण्या त्यांच्या विद्याधनास
विद्यार्थी कसा घडतो इथे जाण
ज्यास असते सामाजिक अन् सांस्कृतिक भान
असे हे विद्यापीठ मराठवाडी
सर्वांना ज्ञानवंत करून सोडी
धगधगत्या उन्हात इथे गारवा
विद्यापीठ परिसर असे हिरवा
कवी - सौ. अनघा शाम कुलकर्णी
(माजी विद्यार्थिनी - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
मोशी प्राधिकरण, पुणे.